साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
अयोध्येत पंधराशे वर्षांपूर्वी मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते. हे अवशेष हा देश हिंदुराष्ट्र असल्याचा पुरावा होता. ज्याप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांची प्राणप्रतिष्ठा करून हिंदू धर्म जागविण्याचे काम केले. तेच काम आज अयोध्यातील राम मंदिराची उभारणी करून नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात ‘जय जय श्रीरामाचा’ जयघोष गुंजणार आहे. हा युवकांचा देश येत्या काळात हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही, असे सडेतोड प्रतिपादन देशातील आघाडीच्या प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी केले. खा.उन्मेश पाटील आणि संपदा पाटील आयोजित उमंग व्याख्यानमालेच्या दहाव्या वर्षाचे प्रथम पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. अंधशाळेच्या प्रांगणात स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त खा.उन्मेश पाटील तसेच उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील आयोजित उमंग व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला.
सुरूवातीला योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, कारसेवक बाळासाहेब नागरे, ज्येष्ठ नेते के.बी. साळुंखे, नगराध्यक्ष करण पवार, पारोळा, नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती अंजली पवार, ज्येष्ठ नेते पोपट भोळे, प्रीतमदास रावलानी, विधानसभा निवडणूक प्रमुख घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजू चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघटन मंत्री ह.भ.प.संदीप महाराज, प्रखंड मंत्री विजय बाविस्कर, शहर मंत्री अविनाश चौधरी, दुर्गा वाहिनी प्रखंड संयोजिका अश्विनी गढरी, प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका वंदना दिदी, माजी शहराध्यक्ष लालचंद बजाज, उद्योजक केशव कोतकर, माजी नगरसेविका वत्सला कोतकर, दिव्यांगांच्या आधारस्तंभ मीनाक्षी निकम, आदर्श शिक्षक शालिग्राम निकम, शीघ्र कवी रमेश पोतदार, श्रीनिवास खंडेलवाल, अरुण राणा, बबन पवार, निशा महाशब्दे, शरद मोराणकर, माजी सभापती सरदार राजपूत, माजी सभापती स्मितल बोरसे, दिनेश बोरसे, नगरसेविका संगीता गवळी, बापू अहिरे, चंद्रकांत तायडे, प्रवीण अमृतकर, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, उद्योजक पद्माकर पाटील, रवींद्र शुक्ल, समकीत छाजेड, अमित सुराणा, मधू कासार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आपण श्रोते नसून नव युगाचे निर्माते आहात : खा. पाटील
गेल्या दहा वर्षांपासून १२ जानेवारी ते १४ जानेवारी या थंडीच्या मोसमात दरवर्षी विचारांची उबदार मेजवानीसाठी आपण उपस्थित राहतात यांचा मनस्वी आनंद आहे. येथील श्रोता यांच्याशी माझी वैचारिक, भावनिक आणि आदराची नाळ जुळली आहे. माझ्या राजकीय जीवन प्रवासात आपण मला भरभरून आशीर्वाद दिले आहे. आपण श्रोते नसून नव युगाचे निर्माते असल्याची भावना खा.उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी राज्याचे मानद वन्यजीव संरक्षक सर्पतज्ज्ञ राजेश ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला.
उमंग सृष्टी परिवाराच्या संपदा पाटील म्हणाल्या की, काजल हिंदुस्तानी सारखी महिला प्रखर ज्वलंत हिंदुत्व राष्ट्राचा विचार घेऊन आपल्यासाठी उपस्थित झाल्या आहेत. आपण एक पालक म्हणून आपल्या पाल्यावर संस्काराची जबाबदारी कशी पार पाडावी, यासाठी त्यांच्या विचारांचा हुंकारही कर्तव्याची शिदोरी असणार आहे. व्याख्यानमालेला ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते पदाधिकारी, युवक उपस्थित होते. सूत्रसंचालन रीनी शर्मा तर आभार राजेश ठोंबरे यांनी मानले.