साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
घरगुती वादातून घरातून निघून गेलेल्या विवाहितेचा मृतदेह पळासरे येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री उघडकीला आली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कविता गोकुळ जगताप (वय २१, रा. वरखेड बुद्रुक, ता.चाळीसगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथे कविता जगताप ही महिला आपल्या पती गोकुळ जगताप यांच्या सोबत वास्तव्याला होती. त्यांच्या घरात कौटुंबिक वाद झाला होता. शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी रात्री त्या शौचास जावून येते, असे सांगून घरातून निघून गेल्या. दरम्यान त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यावर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत पळासरे पाणीपुरवठा विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केला. तपास पोलीस नाईक कुशल शिंपी करीत आहे.