मिडजेट, कॅडेट गटाच्या सामन्यांना गुरुवारी सुरुवात होणार
साईमत/जळगाव/न.प्र.:
जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित आमदार चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आज १५ व १७ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या सामन्यांना प्रारंभ झाला. ह्या दोन्ही गटातील मानांकित खेळाडूंनी आपापले सामने सहज जिंकत आगेकूच केली आहे. राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने एकलव्य क्रीडा संकुल येथे स्पर्धा सुरू आहे. बाद पद्धतीने सामने येथे खेळविण्यात येत आहे. पुण्याच्या नायशा रेवस्कर हिने काल झालेल्या मुलींच्या १९ वर्षाखालील स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. आज ती १५ आणि १७ वर्ष वयोगटात देखील आघाडीवर आहे. मुलींच्या दोन्ही गटात तिने सुरेख खेळाचे प्रदर्शन करतांना विजयी वाटचाल सुरू ठेवली आहे. गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजी मिडजेट आणि कॅडेट गटाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.
नाशिकच्या स्वरा करमरकर ही मुलींच्या १५ व १७ वयोगटात विजयासह पुढे आहे. महिला गटातील उपविजेती ठाण्याची काव्या भट ही सुद्धा १७ वर्ष वयोगटात विजयासह तिसऱ्या फेरीत दाखल झाली आहे. जळगावची राष्ट्रीय खेळाडू स्वरदा साने १५ वर्ष वयोगटात तिसऱ्या फेरीत पोहोचली आहे मात्र तिला १७ वर्ष वयोगटात ठाण्याच्या ऋतुजा चिंचनसुरेने पराभूत केले. १५ वर्ष वयोगटात स्वरदा साने हिने दुसरा विजय मिळविताना मुंबई उपनगरच्या साची मंध्यान हिचा १४-१२, ११-८, ११-२ असा सहज पराभव करून तिसरी फेरी गाठली.
खेळाडूंनी मिळविला तिसऱ्या फेरीत प्रवेश
१७ वर्षं वयोगटातील अव्वल मानांकित मुंबई शहरचा पार्थ मगर, द्वितीय मानांकित प्रणव घोलकर (पुणे), तृतीय मानांकित शिवम विधाते (ठाणे), चतुर्थ मानांकित विशाल खांडेकर (ठाणे) ह्या खेळाडूंनी सहजरित्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.