साईमत जळगाव प्रतिनिधी
शालेय स्पर्धेसाठी शासनाकडून मंजूर असलेल्या निधी पैकी अर्धी रक्कम आयोजक संघटनेला स्पर्धां सुरु होण्यापूर्वी देण्यात यावी अशी मागणी हॉकी व फुटबॉल संघटने चे फारुक शेख यांनी केली आहे.
युवासेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या माध्यमातून आंतर शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून २२ ऑगस्ट २०२३ रोजी क्रीडा कार्यालय व एकविध क्रीडा संघटनाच्या सभेत जोपर्यंत क्रीडा अधिकारी हे खेळासाठी मंजूर असलेल्या रकमे पैकी ५० टक्के रक्कम अग्रीम स्वरूपात त्या खेळाच्या संघटनेला देणार नाही तोपर्यंत त्या स्पर्धा संबंधित संघटना घेणार नाही असे ठरले होते.
१ ते २ सप्टेंबर रोजी हॉकी नेहरू चषक स्पर्धा, ५ ते ६ सप्टेंबर शालेय हॉकी स्पर्धा व ११ ते १९ सप्टेंबर फुटबॉल शालेय स्पर्धेचे पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने हॉकी जळगाव व फुटबॉल संघटनेला दिले आहे. परंतु खेळासाठी मंजूर असलेल्या रकमे पैकी ५० टक्के रक्कम दिली नाही अथवा देण्याची लेखी हमी सुद्धा दिली नाही.
नेहरू चषकच्या विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धा जवळ आल्याने खेळाडूंचे व खास करून शाळांचे नुकसान होऊ नये म्हणून हॉकी जळगाव चे सचिव फारूक शेख यांनी मनपा व उर्वरित स्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेपूर्वी क्रीडा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र
फारुख शेख यांनी १ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हाधिकारी जळगाव, आयुक्त व संचालक क्रीडा व युवा सेवा संचालनालय पुणे यांना लेखी पत्राद्वारे स्पर्धेच्या खर्चाची आगाऊ ५० टक्के रक्कम संघटनेला देण्यात यावी असे लेखी पत्र दिले व तसे ईमेल केला आहे.
खेळाडूचे नुकसान होऊ नये म्हणून निर्णय
खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून हॉकी व फुटबॉल संघटने चे फारुक शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांन सोबत चर्चा करून हा निर्णय घेतला असला तरी जर मागील व आताचा मंजूर निधी मिळाला नाही तर सदर प्रकरणी रकमेचा अपहार केल्याची पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याचेही फारुख शेख यांनी सांगितले आहे