साईमत, भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील गोंडगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. याप्रकरणी खटला चालविण्याची विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी तयारी दर्शविली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी, 8 ऑगस्ट रोजी गोंडगाव येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत आ.मंगेश चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी चित्रा वाघ यांनी या कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. घटनेतील नराधम पीडित कुटुंबाच्यांचाच शेजारी राहणारा असून त्यांच्या कुटुंबाशी कोणतेही वाद नव्हते. मात्र, या नराधमाने भयंकर कृत्य करून चिमुकलीची क्रूर हत्या केली असल्याची माहिती त्यांना सांगण्यात आली. याप्रसंगी आम्हाला न्याय हवा आणि या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर चित्रा वाघ यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. याप्रसंगी ॲड.निकम यांनी आपण हा खटला चालविण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. त्यावर चित्रा वाघ यांनी कायदेशीर बाबींची तात्काळ पूर्तता करून ॲड. निकम हे गोंडगाव येथील बालिकेचा खटला चालविणार असल्याचे सांगितले.
कुटुंबाला पक्षातर्फे मदतीचा धनादेश प्रदान
या प्रकरणातील अनेक पैलू हे चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाकडून जाणून घेतले. तसेच त्यांनी याप्रसंगी भारतीय जनता पक्षातर्फे कुटुंबाला मदतीचा धनादेशही प्रदान केला.