ब्रिटीशकालीन वळण बंधाऱ्याला प्रशासकीय मान्यता : मंत्री अनिल पाटील

0
129

डाव्या तीरावरील पूर पाटचारीच्या दुरुस्तीलाही मंजुरी, दीड कोटींचा भरीव निधी

साईमत/ न्यूज नेटवर्क/ अमळनेर :

तालुक्यातील फाफोरा येथील वळण बंधारा व त्याच्या डाव्या तीरावरील पूर पाटचारीच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव अंतर्गत विशेष दुरुस्ती अंतर्गत एक कोटी ५२ लाख ९२ हजार ४१४ रुपये एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय 23 जुलै रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर बोरी काठावरील गावामध्ये आनंदोत्सवात साजरा होऊन या कामासाठी विशेष पाठपुरावा करणाऱ्या मंत्री अनिल पाटलांचा जयघोष करण्यात आला.

कामाबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री.पाटील म्हणाले की, बोरी नदीवरील ब्रिटीश कालीन बंधारा, कालवा हा मागील 40 वर्षांपासून बंद आहे. सद्यस्थितीत याद्वारे सिंचन करता येत नाही. यामुळे बंधारा दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून होती. तसेच फाफोरा बंधाऱ्याच्या डाव्या तीरावरील वळण कालवा सुमारे ४० वर्षांपासून बंद आहे. या वळण कालव्याद्वारे फाफोरा, अमळनेर शिवारातील शेतीस पूर्वी सिंचनाचा लाभ होत होता. वळण कालवा दुरुस्ती करून त्याद्वारे बोरी नदीतील पाणी वळवून त्याद्वारे अमळनेर परिसरातील धार मालपूर साठवण तलावात पाणीसाठा करण्यासाठी त्या परिसरातील १२ गावाच्या सरपंच व ग्रामस्थांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे आणि प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.

शेतकऱ्यांना मिळाली मोठी भेट

वळण कालवा याठिकाणी दुरुस्ती करून त्याद्वारे बोरी नदीतील पाणी वळवून त्याद्वारे अमळनेर परिसरातील धार, मालपूर साठवण तलावात पाणीसाठा करुन त्या परिसरातील १२ गावांना पाणी देण्याच्या दृष्टीने फाफोरा वळण बंधारा कालवा दुरुस्ती या कामास विशेष दुरुस्ती अंतर्गत म्हणून प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी मंत्री पाटील यांनी शासनाकडे केली होती. यासाठी सतत पाठपुरावा करत अखेर या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्याने शेतकऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. त्यामुळे मंत्री पाटील यांचे कौतुक होत आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे आभार

प्रशासकीय मंजुरीबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here