घोसलाला आदिवासी जयंती उत्साहात साजरी
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील घोसला येथे आदिवासी जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण देशासह आदिवासी बहुल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. घोसला येथे आदिवासी पारंपरिक वाद्य तारपामधून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध तारपा नृत्य, तूर आणि थाळीतून कानी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तालावर ठेका धरत सांस्कृतिक आणि आदिवासी ‘कलाविष्कारांचे’ आदिवासी बांधवांकडून दर्शन घडविण्यात आले. यावेळी भव्य अशा मिरवणुकी दरम्यान ‘जय आदिवासी’, ‘बिरसा मुंडा की जय’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अश्या घोषणांनी परिसर दणाणला होता. मनमोहक दृश्य पाहण्यासाठी घोसला येथील नागरिकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमाला कन्नड येथील उद्योजक पवार यांनी उपस्थिती देऊन मार्गदर्शनही केले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सोयगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन गावातील आदिवासी तरुण बांधवांनी केले होते. कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला होता.