भडगावला आदित्य ठाकरे यांची सभा ऐतिहासिक होणार : वैशाली सूर्यवंशी

0
56

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

पाचोऱ्यात आजवर चार ते पाच सभा अतिशय उदंड उत्साहात पार पडल्या आहेत. त्याचप्रमाणे भडगावातील पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची होणारी सभा ही ऐतिहासिक पद्धतीत पार पडेल, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी बुधवारी, १४ फेब्रुवारी रोजी भडगाव येथील सभास्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भडगाव येथे युवा सेनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा गुरूवारी, १५ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. त्याच्या नियोजनासाठी वैशाली सूर्यवंशी यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

याप्रसंगी त्या म्हणाल्या की, शिवसेना पक्षात गद्दारी झाल्यानंतर वडील उध्दव ठाकरे संकटात असल्याचे पाहून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पायाला भिंगरी बांधल्यासारखे राज्यभरात दौरे सुरू केले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. दोन वर्षापूर्वीचे आदित्य ठाकरे आणि आताचे आदित्य ठाकरे यात मोठा फरक झाला आहे. आपल्या वडिलांच्या तब्बेतीकडे लक्ष देऊन त्यांनी स्वत: आता मैदानात उतरून निष्ठा यात्रेला सुरूवात केली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांचा जिल्हा दौरा जळगाव ग्रामीणपासून होत आहे. त्यानंतर भडगाव शहरात त्यांची सभा होणार आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी अचुक नियोजन करण्यासाठी प्रत्येक बुथच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मला राजकरणाचा वारसा असला तरी प्रत्यक्षात कामाचा कोणताही अनुभव नाही. परंतु आज जे काही करत आहे ते कार्यकर्त्यांच्या विश्‍वासावर करत आहे. त्यांच्या कामाची एनर्जी पाहून मला कामाची डबल एनर्जी मिळत असल्याचेही वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here