विहितगावला शिवसेना ठाकरे गट, मनसे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा
साईमत/नाशिकरोड/ प्रतिनिधी :
नाशिक महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून, १६ तारखेला मतमोजणी आहे. या दिवशी महानगरपालिकेत आमची सत्ता येणार व परिवर्तन घडविणार असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. विहितगाव येथील साई ग्रँड लॉन्समध्ये शिवसेना ठाकरे गट व मनसे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, मनसेचे सलीम मामा शेख, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, उपजिल्हाप्रमुख भैय्या मणियार, केशव पोरजे, योगेश गाडेकर, हेमंत गायकवाड, योगिता गायकवाड, सुवर्णा काळुंगे यांच्यासह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, नाशिकमध्ये रावणाचे राज्य उलथवून श्रीरामाचे राज्य आणायचे आहे. आश्वासनाला बळी पडायचे की प्रामाणिकपणाला साथ द्यायची हे तुम्ही ठरवायचे आहे. आपल्याला आपला महापौर या शहरात बसवायचा आहे. या देशात, महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे ते सांगा. लाडक्या बहिरीला फसविले जात आहे. शेतकरी आत्महत्या करत असून, कर्जमाफी केली जात नाही. नवीन उद्योगधंदे नाशिकमध्ये का येत नाही? याचे उत्तर भाजपकडून दिले जात नसून, सध्या खोटे बोलून रेटायचे एवढेच काम सुरू आहे, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, आमचे प्रेम नाशिकवर असून, बिल्डरांवर नाही.आम्ही जे मुंबईत करून दाखवले ते नाशिकमध्ये करून दाखवणार आहोत, असे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. नाशिकचे तपोवन आपल्याला वाचवायचे आहे. भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व खोटे असून, ते लोकांची दिशाभूल करत आहे. आपण सर्व नाशिककर म्हणून एकत्र आलो असून, तुम्ही ठरवा कोणाला जिंकवायचे आहे. राम आमच्या मनात आहे, मात्र तुमच्या मनात नाही. तुमच्या मनात असते तर ते वृक्ष तोडायचा निर्णय घेतला नसता. झाडे तोडून ते बिल्डरांच्या घशात टाकायचे आहे का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला.
तसेच “ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना तुम्ही सोबत घेत आहात, हे नेमकं कशासाठी? नाशिकचे चित्र सध्या बदलले असून, मोठ्या प्रमाणात मूलभूत प्रश्न निर्माण झाल्याने त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही मुंबईत पंचवीस वर्षे जे करून दाखविले, ते आता नाशिकमध्ये करून दाखविणार आहोत. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना मनसे युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा”, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी उपस्थित मतदारांना केले.
