आदिशक्ती संत मुक्ताई, चांगदेव महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ

0
29

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

येथील संत मुक्ताबाई यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. भाविकांनी यात्रेचा मुख्य दिवस असलेल्या गुरुवारी, ७ मार्च रोजी भागवत एकादशीला सकाळपासून जुने मुक्ताई मंदिर (कोथळी), नवीन मुक्ताई मंदिर, मेहूण येथील मुक्ताई, चांगदेव येथील योगीराज चांगदेव महाराज मंदिर येथे गर्दी केली होती. यावेळी शेकडो दिंड्या मुक्ताईनगरमध्ये दाखल झाल्या आहेत. टाळ, मृदंगाच्या गजरात दाखल झालेल्या दिंड्यामुळे मुक्ताईनगर दुमदुमले होते. गुरुवारी पहाटेपासूनच १२५ दिंड्या मुक्ताईनगर येथे दाखल झाल्या आहेत. तसेच मुक्ताईनगर शहरात स्टॉल लावून ठिकठिकाणाहून येणाऱ्या वारकरी, भाविकांसाठी चहा, फराळाचे वाटप करण्यात आले. पाणपोईची व्यवस्था केली आहे. मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिरात केऱ्हाळा येथील मुरलीधर पाटील, नाचणखेडा येथील तरुण मित्र मंडळातर्फे फराळासह केळीचेही वाटप करण्यात आले. भागवत एकादशीच्या दिवशी लाखो भाविकांनी श्री संत मुक्ताईच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावर्षी महाशिवरात्र लागोपाठ आल्याने दिंड्या चांगदेव गावाकडे निघत आहेत.

भागवत एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर श्री संत मुक्ताई मंदिर कोथळी येथे आदिशक्ती मुक्ताईची महापूजा मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच आ.चंद्रकांत पाटील आणि यामीनी पाटील यांनी मुक्ताईचा अभिषेक करुन महापूजा केली. यावेळी पुजारी विनायक व्यवहारे, ह.भ.प.उद्धव जुनारे तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शरद पवार गट रा.काँ.चे नेते आ.एकनाथराव खडसे, महिला प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे यांनीही मुक्ताईचे दर्शन घेतले.

नवीन मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर येथे एकादशीच्या दिवशी पहाटे सम्राट पाटील यांनी मुक्ताईचा अभिषेक व पूजा केली. यावेळी मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे, ज्ञानेश्‍वर हरणे यांच्यासह भाविक, महिला, पुरुष उपस्थित होते. श्री क्षेत्र मेहुण येथे जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी मुक्ताईची पूजा केली. याप्रसंगी ह.भ.प. सुधाकर महाराज, ह.भ.प. रामराव महाराज, ह.भ.प.भानुदास महाराज, ह.भ.प. गाढे महाराज, विकास पाटील, मोहन पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते.

जुने कोथळी येथील मुक्ताई मंदिराकडे जाण्यासाठी आस्था नगरीत वाहन पार्किंगची व्यवस्था तसेच कोथळी गावातून मुक्ताई मंदिराकडे येताना एका शेतात दुचाकी व चार चाकी वाहन स्थळाची व्यवस्था केलेली होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधिकारी नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

वारकऱ्यांसह भाविकांसाठी फराळाचे वाटप

मुक्ताईनगर शहरातील रामरोटी आश्रमात एकादशीनिमित्त चार क्विंटल फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच ह्दयरोग तज्ज्ञ डॉ.एन.जी.मराठे, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पंजाबराव पाटील, पूनमचंद जैन, राजेंद्र पाटील, ललित महाजन, नारायण ठाकरे, आत्माराम सावकारे, विजय शुरपाटणे, के. डी.पाटील, जे.डी.पाटील, एल.टी.पाटील, महावीर बोथरा, उषाबाई कोळी यांच्याकडून यात्रेनिमित्त एकादशीला संत मुक्ताईच्या नगरीत आलेल्या भाविक- भक्त वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी रामरोटी आश्रमाचे अध्यक्ष किशोर गावंडे, सचिव रामभाऊ टोंगे, किरण महाजन यांच्यासह भाविकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here