अडावदला उर्दू शाळेने विनापरवानगी खासगी जागेत बसविले ‘गेट’

0
76

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर

येथुन जवळील अडावद येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचा पूर्वीपासून पश्चिमेस वापराचा रस्ता आहे. तेथे प्रवेशद्वार (गेट) अस्तित्वात असतांना शाळेच्या मागील बाजूस बस स्टँडकडील पूर्वेस ग्रामपंचायत किंवा शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे अचानक लोखंडी प्रवेशद्वार बसविले आहे. तेथील रहिवाश्यांच्या वापराची खासगी बोळ ताब्यात घेण्याच्या इराद्याने आणि अतिक्रमित गेटच्या पुढील जागा ब्रिटिश काळापासून गुरांच्या कोंडवाड्याची आहे. तिची न्यायालयीन प्रक्रिया अद्यापही सुरू असतांना तेथे नवीन प्रवेशद्वार बसवून वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाश्यांसह ग्रामस्थांनी प्रशासनास निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संबंधित विभागांना चौकशीचे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जि.प. प्राथमिक मुलांची आणि मुलींची शाळा गावाच्या मध्यवस्तीत आहे. शाळा स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत शाळेच्या पश्चिमेस प्रवेशद्वार हे प्रशस्त रस्त्याला लागून आहे. असे असतानाही जि.प.प्राथमिक उर्दू मुलांच्या आणि मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता शाळेच्या मागील बाजूस पूर्वेकडे लोखंडी प्रवेशद्वार बसवून रस्ता बनविण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेच्या मागे रहिवाश्यांची खासगी बोळ आहे. त्या जागेला लागून सरकारी गुरांच्या कोंडवाड्याची जागा ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे. सध्या या कोंडवाड्यांच्या सरकारी जागेसंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. असे असतानाही न्यायप्रविष्ट जागेला लागून पूर्वी कधीही रस्ता नसतानाही अतिक्रमण करून प्रवेशद्वार बसवून वहीवाट रस्ता बनविणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

…अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

जि.प. उर्दू शाळेची जागा ही जिल्हा परिषदेची सरकारी मालमत्ता आहे. प्रशासनाने नियमानुसार नगर भूमापन विभागातर्फे शाळेची जागा चतुःसीमेसह मोजणी करून जागेचे कायम स्वरूपी सीमांकन करून घ्यावे. त्यामुळे कुठलाही वाद उद्भवणार नाही. अशी सनदशीर मार्गाने मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात संबंधितांनी दखल न घेतल्यास अन्यथा न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here