अमळनेरात अनंत चतुर्दशीला होणार आदर्श मंडळांचा ‘श्री’ सन्मान

0
33

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

शहरात गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त शांततेत मिरवणूक काढणाऱ्या आदर्श मंडळांचा ‘श्री’ सन्मान करण्यात येणार आहे. यानिमित्त अमळनेरची मंडळाचे स्वागत करण्याची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू होणार आहे. सर्व गणेश मंडळांनी आदर्श मिरवणूक काढून सन्मानाचे मानकरी व्हावे, असे आवाहन केले आहे. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, मुंदडा फाउंडेशन, पोलीस स्टेशन आणि नगरपरिषद अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान करण्यात येणार आहे.

खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. यासाठी मंडळ आदर्श असावे, आदर्श म्हणजे विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात मात्र कोणताही वादविवाद किंवा गोंधळ न घालता, शिस्तबद्ध, पर्यावरण आणि वेळेच्या आत काढून पुरस्काराचे मानकरी व्हायचे आहे. हा सन्मान दगडी दरवाजासमोर निर्माण केलेल्या भव्य मंचावरून होणार आहे. येथे सन्माननीय सर्व लोकप्रतिनिधी आणि सन्माननीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श मंडळ म्हणून ‘श्री’ सन्मान पुरस्कार म्हणून ट्रॉफी बहाल करण्यात येणार आहे. याचवेळी गणेश विसर्जनासाठी परिश्रम घेणारे, पोलीस, महसूल आणि पालिका क्षेत्रातील अधिकारी तसेच जातीय सलोखा राखण्यासाठी सहकार्य करणारे मुस्लिम बांधव यांचाही लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते आदर्श अधिकारी म्हणून ‘श्री’ सन्मान करण्यात येणार आहे. सत्काराची वेळ सायंकाळी ६ ते रात्री १२ असणार आहे. तसेच सातव्या व नवव्या दिवशी शांततेत मिरवणूक काढणाऱ्या मंडळाचाही ‘श्री’ सन्मान करण्यात येणार आहे.

सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शांततेत मिरवणूक काढून आपल्या भूमीत सलोख्याचे वातावरण कायम ठेवावे. ‘श्री’ सन्मानाचे मानकरी व्हावे, असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, मुंदडा बिल्डर्स, पोलीस स्टेशन, नगरपरिषद यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here