साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भयेकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.जयंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण संख्या करणे व २०२५ पर्यंत तालुका क्षयरोग मुक्त करणे या कार्यक्रमांतर्गत निदान न झालेले कुष्ठरुग्ण व निदान न झालेले क्षयरुग्ण यांना उपचाराखाली आणणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी सर्वेक्षण टीमला सहकार्य करून स्वतः पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्याकडून केले आहे.
कुष्ठरोगामध्ये अंगावर फिकट लालसर चट्टा, तेलगट चमकणारी त्वचा, अंगावरील गाठी, हातापायाला बधिरता अशी लक्षणे तर क्षयरोगामध्ये दोन किंवा अधिक कालावधीचा खोकला, दोन किंवा अधिक कालावधीचा ताप, वजनात घट होणे, भूक न लागणे, मानेवरील गाठी आदी लक्षणे दिसून येतात. तालुक्यात मोहिमेसाठी २५२ टीम व पर्यवेक्षण करण्यासाठी ५० सुपरवायझर कार्यरत आहेत. टीमकडून ३१ हजार ७२५ घरांमधील ३,०९,१५७ नागरिकांची तपासणी केली जात आहे. आजतागायत १ लाख २३ हजार ३२७ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये संशयित कुष्ठरुग्ण ३८३ व संशयित क्षयरुग्ण १३२ आढळून आले आहेत.