Action Taken Against : अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई, ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
14

शनीपेठ पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील इस्लामपुरा भागात अवैधपणे गोमांसची विक्री करणाऱ्यांवर शनीपेठ पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी कारवाईसाठी आलेल्या महिला पोलीस निरीक्षकांच्या अंगावर धावून येत दोन महिलांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत तीन जणांविरुध्द वेगवेगळ्या कलमान्वये शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इस्लामपुरा भागातील मदिना मशिदजवळ काही जण अवैधपणे गोमांस विक्री करत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्वत: पथकासह सोमवारी, ९ जून रोजी कारवाई केली. त्यावेळी नरगिस रऊफ खान (वय २०), जमीलाबी अजिज शेख (वय ७०, दोन्ही रा. इस्लामपुरा, जळगाव) यांनी आरडओरड करत पोलिसांना आरेरावी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या अंगावर धावून हात उगारून धक्काबुक्की करत आणि शिवीगाळ केली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विक्की इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नरगिस रऊफ खान, जमीलाबी अजिज शेख आणि मुस्तकीन शेख अजीज (तिन्ही रा. इस्लामपुरा) यांच्याविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात अवैधरित्या गोमांस बाळगणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here