पोलिसांचा दणका : १३ लाख ७१ हजारांचा दंड वसूल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी, २४ डिसेंबर रोजी धडक ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ राबवण्यात आली. मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११०० हून अधिक वाहनधारकांना पोलिसांनी दणका दिला आहे. एकाच दिवसात तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मोहिमेदरम्यान पोलिसांनी प्रामुख्याने विना नंबर प्लेट फिरणारी आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ४६३ वाहनांवर कारवाई करून ४ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात १०७ अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळली. त्यांच्या पालकांकडून पोलिसांनी ४ लाख ४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. “आपल्या पाल्यांच्या हाती वाहने देऊन त्यांचे आयुष्य धोक्यात घालू नका,” असे भावनिक आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
वाहतूक पोलिसांची जिल्ह्यात नाकाबंदी
जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव यांसह जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कडक नाकाबंदी केली होती. त्यामध्ये विना हेल्मेट, विना परवाना आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३६ केसेस दाखल केल्या. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी आणि वाहतूक शाखांनी केली. आगामी काळातही अशाच प्रकारची मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस दलाने दिले आहेत.
