सोशल मीडियावरील तक्रारींना प्रतिसाद; पाच हातगाड्या जप्त, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने दखल घेत धडक कारवाई केली. शनिवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई करत दोन्ही गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले.
शनिपेठेतील बळीराम मंदिर व शनिमंदिर समोरील गल्लीत दररोज भाजीपाला विक्रेते लोटगाड्या लावून किंवा रस्त्यावर बसून विक्री करत होते. त्यामुळे जवळपास ७० टक्के रस्ता अडवला जात होता. वाहनचालकांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा राहत नव्हती. विशेषतः शनिवारी गर्दीच्या दिवशी परिस्थिती अधिकच बिकट होत होती. काही विक्रेत्यांकडून अरेरावीचे प्रकारही होत असल्याच्या तक्रारी होत्या.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तक्रारीची दखल घेत स्थानिक नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी तत्काळ पुढाकार घेत मनपा प्रशासनाशी थेट संपर्क साधला. त्यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तसेच अतिक्रमण विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्याशी चर्चा करत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “नवीन तयार केलेले रस्ते जर नागरिकांना वापरण्यास मिळत नसतील, तर अशा रस्त्यांचा उपयोग काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अतिक्रमणामुळे सर्वसामान्यांना त्रास होता कामा नये, असेही त्यांनी प्रशासनाला बजावले.
यापूर्वी ‘शनिवार असल्याने सुट्टी आहे’ असे कारण देणारा अतिक्रमण विभाग नगरसेवकांच्या हस्तक्षेपानंतर तातडीने सक्रिय झाला. शनिवारी दुपारी पथक गल्लीत दाखल झाले आणि धडक कारवाई करत दोन्ही गल्ल्या पूर्णतः मोकळ्या केल्या. या कारवाईदरम्यान पाच हातगाड्या जप्त करण्यात आल्या.
अनेक दिवसांपासून अतिक्रमणामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी गल्ल्या मोकळ्या झाल्याने समाधान व्यक्त केले. रस्त्यांनी जणू मोकळा श्वास घेतल्याची भावना व्यक्त करत नागरिकांनी नगरसेवक आणि अतिक्रमण विभागाचे आभार मानले. नागरिकांच्या तक्रारी, सोशल मीडियावरील दबाव आणि लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे प्रशासन हलते, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
