स्पर्धात्मक युगात यशस्वीसाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करा

0
31

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये क्षमताधिष्ठीत, स्किल बेस्ड अभ्यासक्रमात संभाषण कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्कृष्ट संभाषण कौशल्याच्या सहाय्याने जीवनात प्रचंड यशस्वी होता येते, हे स्पष्ट करत इंग्रजीतून बोलण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मनात असणारी भीती किती निरर्थक आहे हे सांगून प्रा.डॉ.अनिल क्षीरसागर यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच संभाषण करीत असताना शब्दसंग्रह अत्यंत उपयुक्त आहे. त्यांनी BBC Learning English.com Oxford learnerdictionaries.com ह्या दोन संकेतस्थळांचा सखोल अभ्यास करावा, असे सुचविले. आपल्या व्याख्यानात त्यांनी जीवनात संभाषणाचे महत्त्व विषद करून संभाषणाचे विविध प्रकार कोणते असतात हे स्पष्ट करताना संभाषणाशिवाय आयुष्य किती अर्थहीन आहे, हे सोदाहरण स्पष्ट केले.

येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव येथे इंग्रजी विभागाच्यावतीने ‘इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल’ विषयावर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रा.डॉ.अनिल क्षीरसागर (सहयोगी प्राध्यापक इंग्रजी विभाग मू.जे.महाविद्यालय) हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

सुरुवातीला प्रा.डॉ.क्षीरसागर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्य के.जी. सपकाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक प्रा.आर. बी.ठाकरे, तिन्ही शाखांचे समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, उमेश पाटील, प्रसाद देसाई, इंग्रजी विषयाचे इन्चार्ज डॉ.अतुल इंगळे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सुरेखा पाटोळे यांनी करुन दिला.

यशस्वीतेसाठी प्रा.रूपम निळे, प्रा.दीपक चौधरी, प्रा.जयंत इंगळे, प्रा. किरण कोळी, प्रा.गणेश सूर्यवंशी, प्रा.संध्या महाजन यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ.अतुल इंगळे, सूत्रसंचालन प्रा.योगेश धनगर तर आभार प्रा.संदीप गव्हाळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here