Rejected 69 Amendments : जळगावातील मनपाच्या प्रभाग रचनेवर एक दुरुस्ती स्वीकारत ६९ हरकती नाकारल्या

0
12

प्रभाग ४ मधील माजी नगरसेवक कैलास सोनवणेंची एकमेव हरकत मान्य

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जळगाव महानगर पालिका निवडणुकीसाठी गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी अंतीम प्रभाग रचना जाहीर झाली. शहराच्या १९ प्रभागातून ७५ नगरसेवक निवडून येतील. त्यात चार नगरसेवक निवडून देणारे प्रभाग १८ आणि तीन सदस्य निवडून देणारा केवळ एक प्रभाग आहे. सर्व प्रभाग रचनेची अधिकृत अधिसूचना गुरुवारी जाहीर केली आहे.

मनपाच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा गेल्या ३ सप्टेंबर रोजी जाहीर झाला होता. त्यावर हरकती व सूचना ३ ते १५ सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आल्या. ७० हरकती आल्या होत्या. १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान या हरकतींवर सुनावणी होवून सविस्तर अहवाल विभागीय कार्यालय व निवडणूक विभागाला सादर केला. निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना ९ ऑक्टोबर रोजी जाहीर केली. प्रभाग रचनेविषयी अनेक हरकती आल्या होत्या. काही इच्छुकांनी अपेक्षित मतदार जोडणे-तोडण्याच्या हेतूने हरकती घेतल्या होत्या. मात्र, ७० पैकी ६९ हरकती फेटाळल्या गेल्या. केवळ एक हरकत प्रभाग ४ मधील रचनेविषयी स्वीकारली गेली. ही हरकत माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी नियमानुसार व मुद्देसूद मांडत सादर केली होती.

प्रभाग ४ मध्ये प्रगणक ६९ चा भाग जोडला

प्रगणक ६९ चा भाग हा तुकडा तोडून (म्हणजे बारीक बोळीचे विभाजन ग्राह्य मानून) प्रगणक ८५ ला जोडला होता. तो भाग प्रभाग ५ ला जोडला गेला होता. मात्र, प्रभाग रचनेत सुलभपणा असावा म्हणून निवडणूक आयोगाने प्रगणक विभाजन मुख्य मोठा रस्ता धरून करावे, शाळा, रुग्णालय एका प्रभागात ठेवावे. अशा सूचना केल्या होत्या. त्याच सूचनांचा संदर्भ देत कैलास सोनवणे यांनी रितसर हरकत घेत प्रभाग ४ साठी मुख्य रस्ता ही हद्द मानून प्रगणक ६९ चा भाग प्रभाग ४ ला जोडावा, असे सूचविले होते. कैलास सोनवणेंची ही हरकत स्वीकारून प्रभाग ४ मध्ये प्रगणक ६९ चा भाग जोडला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here