साईमत मुंबई प्रतिनिधी
नाशिक विभागातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनाच्या प्रलंबित कामाना गती देऊन ती कामे मार्च 2024 पर्यंत दर्जेदार व मुदतीत पुर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
नाशिक विभागातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधिक्षक अभियंता अजय सिंह , नाशिक विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नाशिक विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ज्या पाणी पुरवठा योजनाच्या कामाला कार्यारंभ आदेश दिला नसेल अशा कामाना तत्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावा. ज्या गावातील पाणी पुरवठा योजनाना अडचणी असतील त्यासाठी तेथील ग्रामसभेचा ठराव घेऊन निर्णय घ्यावा. यासाठी लोकप्रतिनिधीचे सहकार्य घ्यावे तसेच जे ठेकेदार काम करत नाही त्यांच्यावर कारवाई करावी. त्रयस्थ तपासणी संस्थानी पाणी पुरवठा योजनाच्या कामाची काटेकोरपणे तपासणी करावी आणि तपासणी अहवाल हा दर पंधरा दिवसांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावे. आदिवासी गावातील घरगुती नळजोडणीचे उदिष्ट पुर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.हर घर जल कामाची उदिष्टे 26 जानेवारी 2024 पर्यंत पुर्ण करण्यासाठी ग्रामसभा घेऊन उदिष्ट पुर्ण करावीत. तसेच शिल्लक निधी लवकरात लवकर खर्च करण्याचे निर्देशही मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी ना . गुलाबराव पाटील यांनी ,पाणी पुरवठा योजनेची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावी. दर पंधरा दिवसांनी कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा. योजना साठी दिलेला निधी वेळेत खर्च करावा .जे ठेकेदार काम वेळेत आणि दर्जेदार करीत नाही त्यांच्यावर कारवाई करावी .पाणी पुरवठा योजनाची कामे मार्च 2024 पर्यंत पुर्ण करावीत अशा सूचनाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केल्या.