मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी मोठा धक्का मनाला जातो.या घडामोडीदरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स जारी केले. आज त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजार राहायचे होते . मात्र काही कारणास्तव मी आज ईडीच्या चौकशीला हजर राहू शकत नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात असणारे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल… ओक्के मदी सगळं, असं बोलताना दिसत आहे. हाच धागा पकडून देशपांडे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. ईडीच्या चौकशीनंतर आता संजय राऊत म्हणतील, काय ती ईडी, काय चौकशी अन् काय ते जेल, सर्व ओके आहे, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
दरम्यान राऊत यांनी आपल्याला ईडीने समन्स पाठवल्याची माहिती दिली. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीत जाणार नाही. या मला अटक करा, अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी ईडीचे समन्स बजावल्यानंतर दिली होती.