‘आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर

0
29

धुळे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे  यांनी अनेक आमदारांसोबत बंडखोरी करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यांच्या बंडखोरीत आमदार, मंत्र्यांसह धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार  जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, महानगरप्रमुख सतीश महाले हे देखील सामील झाले. यामुळे येथील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत `दे दणका` मोर्चा काढून त्यांचा निषेध केला. तसेच या बंडखोरीमागे भाजपचा  हात असल्याचा आरोप संतप्त शिवसैनिकांनी केला. या मोर्चादरम्यान ‘आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर, अशा घोषणाही शिवसैनिकांनी केल्या आहेत.

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ती मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चातून व्यक्त झाली. यात महिला शिवसैनिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. यावेळी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री सत्तार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला . शिवसैनिक गद्दारांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे मोर्चेकरी सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री यांनी सांगितले.

या भव्य मोर्चात उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख मनोज मोरे, समन्वयक धीरज पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भदाणे, कैलास पाटील, डॉ. सुशील महाजन, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, माजी महापौर भगवान करनकाळ, माजी महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत गुरव, तालुकाप्रमुख नाना वाघ, विश्वनाथ सोनवणे, अरुण धुमाळ, नितीन पाटील, मनीष जोशी, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, अरुणा मोरे, जयश्री वानखेडे, गायत्री लगड, नगरसेविका जोत्स्ना पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here