अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार

0
76

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

येथील ३३ वर्षीय युवक मोटरसायकलने बोदवडकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ठार झाल्याची घटना सोमवारी, २० मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. नितेश भालचंद्र हिवराळे (वय ३३, रा. वडगाव डिघी, ता. नांदुरा, ह.मु. गोकुळधाम, मलकापूर) असे मयत युवकाचे नाव आहे.

सविस्तर असे की, नितेश हिवराळे हा क्रेन मशीनचे कॉन्टॅक्ट बेसवर रेल्वेचे काम करीत आहे. त्याच्याकडे असलेली हिरो होंडा शाइन क्र. एमएच २८एवाय ७५८३ गाडीने कोलाडी बोदवड येथे सुरू असलेल्या कामावरती येणे-जाणे करीत होता. २० मे रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास देवानंद वानखेडे (रा. शिरसोडी, ता.नांदुरा) यांनी फोनद्वारे माहिती दिली की, १९ मे रोजी रात्री अंदाजे दहा वाजेच्या सुमारास नितेश भालचंद्र हिवराळे हा कामानिमित्त मलकापूरवरून बोदवडकडे निघाला होता. सकाळी माहिती मिळाली की, मलकापूर रस्त्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन दिशादर्शक बोर्डाजवळ सालीपुरा नाकाजवळील दगडी पुलावर अपघात होऊन पडला आहे. तसेच त्याला पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले आहे. त्याच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली, एक भाऊ असा परिवार आहे.

अपघातात त्यास गंभीर डोक्याला मार लागून तसेच त्याचा डावा हात मोडलेला आहे. त्याच्या मोटरसायकलचे नुकसान झालेले आहे. अज्ञात वाहनाने भरधाव वेगात निष्काळजीपणाने चालून त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतकाचे आजोबा नथुजी हिवराळे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here