मन्यारखेड्यातील तलावात तरुणाचा मृतदेह आढळला

0
35

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

बुलढाणा जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाचा मन्यारखेडा(ता.जळगाव) तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलिस स्टेशनात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय२२), रा.धामणगाव (ता.मोताळा जि.बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश सुरळकर हा जळगाव एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या बहिण व मेव्हणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आला होता.

गेल्या आठ दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरून गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु काहीच माहिती मिळाली नाही. दरम्यान, शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मन्यारखेडा गावानजीक असलेल्या तलावात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नशिराबाद पोलिसांनी धाव घेवून पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. सुरुवातीला नशिराबाद पोलीस ठाण्यात अनोळखी म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

त्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून मृताची ओळख पटून अंकुश सुरळकर असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या पश्चात आई कामिनी, वडील शिवाजी दशरथ सुरळकर, मोठा भाऊ निलेश आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here