इन्स्टाग्रामवरील ‘भाई’ स्टाइल रील ठरली डोकेदुखी; जळगाव पोलिसांची धडक कारवाई
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
सोशल मीडियावर ‘भाईगिरी’चे प्रदर्शन करून प्रसिद्धी मिळवण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडल्याची घटना जळगावमध्ये समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर गुंडशाहीची भाषा वापरत रील पोस्ट करणाऱ्या चेतन सोळंके या तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत चांगलाच धडा शिकवला. या कारवाईनंतर संबंधित तरुणाचा माफीनामा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सध्या तरुणांमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी वेगवेगळे ट्रेंड फॉलो करण्याची स्पर्धा लागलेली दिसते. यात काही जण ‘भाईगिरी’, शस्त्रांचे प्रदर्शन किंवा गुंडशाहीचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्स तयार करताना दिसतात. अशाच प्रकारची एक रील चेतन सोळंके या तरुणाने तयार करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. या रीलमध्ये वापरलेली भाषा आणि आशय लक्षात घेता ती झपाट्याने व्हायरल झाली.
दरम्यान, या प्रकाराची दखल घेत जळगाव शहर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला कायद्याची जाणीव करून देत अशा प्रकारच्या कृत्यांचे गंभीर परिणाम समजावून सांगितले. पोलिसांच्या या कारवाईचा धसका घेत चेतनने लगेचच आपली भूमिका बदलली.
यानंतर पोलिसांसमोरच त्याने एक नवीन व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये त्याने हात जोडून आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. “जळगाव जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. माझ्याकडून चुकीची रील पोस्ट झाली. त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. यापुढे मी किंवा माझ्या मित्रपरिवारातील कोणीही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणार नाही,” असे तो या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो.
या संपूर्ण प्रकरणानंतर जळगाव पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी आणि विधायक कामांसाठी करावा. गुन्हेगारीचे उदात्तीकरण किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. पोलिसांच्या या कडक भूमिकेमुळे सोशल मीडियावर ‘स्टंटबाजी’ करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
