पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाखालील घटना ; पोलिसात गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील भर रहदारीच्या पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाखाली गेल्या १४ सप्टेंबर रोजीच्या रात्री कार काढण्यावरून घडलेल्या घटनेत टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. अशा किरकोळ वादातून उफाळलेल्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांना जबाब नोंदवता आला नव्हता. अखेर पोलिसांनी गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी त्याचा प्राथमिक जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी माहिती घेतल्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, शाहूनगरातील रहिवासी जुबेर हमिद खाटीक (वय २८) हा कोंबडी व बकरी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. शाहूनगर भागात रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने त्याने आपली कार शिवशक्ती कारबाजाराजवळ काही दिवसांपासून पार्क केली होती. तो सोमवारी रात्री कार काढण्यासाठी जुबेर उड्डाणपुलाखाली गेला होता. तेव्हा कार पार्किंग काढण्याच्या कारणावरून टोळक्याशी त्याचा वाद झाला. पाहता पाहता हा वाद उफाळला. त्यानंतर टोळक्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात धारदार शस्त्रांनी वार करून जुबेरला गंभीर दुखापत केली. हल्ला होत असताना परिसरातील काही तरुण घटनास्थळी येतांना दिसताच हल्लेखोर तेथून पसार झाले होते.
जखमीची प्रकृती चिंताजनक
जुबेरला रक्तबंबाळ अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, अंतर्गत दुखापत गंभीर असल्याने त्याला रिंगरोड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. हल्ल्यात सहभागी असलेले हल्लेखोर ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींना गजाआड करण्यासाठी प्रयत्न वेगात सुरु असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांनी कठोर पाऊल उचलण्याची अपेक्षा
शहरातील गर्दीच्या ठिकाणी, तेही रेल्वे उड्डाणपुलाखाली झालेल्या अशा हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. किरकोळ कारणावरून थेट धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यापर्यंत आता परिस्थिती जाऊ लागल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्यावर पोलीस अधीक्षकांनी कठोर पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
