एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील एमआयडीसी परिसरातील जय आनंद दाल मिलच्या कंपनीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने बुधवारी, ११ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अजय बुधराम पाटील (वय २२, रा. एमआयडीसी, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मूळचा मध्यप्रदेशातील नेपानगर येथील रहिवासी असलेला अजय पाटील गेल्या तीन वर्षांपासून आपल्या पत्नीसोबत एमआयडीसीतील जय आनंद दाल मिल कंपनीच्या खोल्यांमध्ये वास्तव्याला होता. त्याच कंपनीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी रात्री अजयने नेहमीप्रमाणे पत्नीसोबत जेवण केले. त्यानंतर त्याची पत्नी घराबाहेर भांडी धुत असताना अजयने घरात जाऊन दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे
पत्नीने केली आरडाओरड
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर त्यांनी अजयला खाली उतरवून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. अजयने आत्महत्या का केली? त्याचे कारण अद्याप समजु शकलेले नाही. तपास पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद पाटील करत आहेत.