साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी
येथील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या शिवाजीरोड वरील नगरपरिषद मुख्यालय समोर असलेल्या एका दुकानात असलेल्या महिलेची पोत हिसकावून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी घडला
.
सदर घटना अशी की संगीता उगले यांच्या स्कॉलर पॉईंट हे स्टेशनरी स्टोअरचे दुकान असून दुपारच्या सुमारास त्या दुकानात असताना एक अनोळखी इसम पेन घेण्याच्या बहाण्याने आला.पेन घेतल्यावर साई मंदिर कुठे आहे म्हणत पत्ता विचारला त्यात उगले यांनी सदर पत्ता माहीत नसल्याचे सांगितले.दरम्यान सुट्टे पैसे देत असताना त्यात चिल्लर समाविष्ट होती.त्यातून एक रुपयाचा डॉलर काऊंटरच्या आतील बाजूस संशयिताने मुद्दाम पाडला. उगले या तो डॉलर देण्यास खाली वाकल्या बरोबर आरोपीने काहीतरी वस्तूच्या आधारे काही कळण्याच्या आत गळ्यातील पोत कापली. सदर डॉलर आरोपीस देत असताना उगले यांना त्यांची पोत संशयिताच्या हातात दिसली.त्यात संगीता उगले या प्रचंड घाबरल्या.त्यांना सदर प्रकरण लक्षात आल्या बरोबर पुतण्या अक्षय यास जोरजोरात हाक मारत घरात बघण्यासाठी गेल्या. त्याधीच सदर संशयिताने तेथून पोबारा केला होता.पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी करत आसपासचे सीसीटिव्ही फुटेज तपासले.त्यात मोटारसायकल वर आलेल्या दोघांनी शिवाजी चौकापासून रस्त्यांचे तपासणी करत सदरचा प्रकार केल्याचे प्रथमदर्षणी दिसून आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली बालकदास बैरागी करत आहे.
एरवी उपनगरात होणाऱ्या लुटमार विषयी अधिच चिंता व्यक्त केली जात असताना ओझर शहराच्या सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी घडलेला प्रकार पोलिसांना आव्हान देऊन गेला आहे.या घडलेल्या घटनेमुळे गावातील नागरिक भयभीत झाले असताना पोलीस नेमकी काय उपाययोजना करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष्य लागले आहे. सुरक्षित ठिकाण समजल्या जाणाऱ्या याच वर्दळीच्या वस्तीत घडलेल्या गंभीर प्रकारामुळे चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.