A Wireman Contracted By Mahavitaran : महावितरणच्या कंत्राटी वायरमनला ५ हजाराची लाच भोवली

0
13

प्रभात कॉलनीत जळगाव एसीबीची कारवाई

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचा बहाणा करत वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणमधील एका कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. भूषण शालिग्राम चौधरी (वय ३७, रा. जळगाव) (कंत्राटी वायरमन, नेमणूक प्रभात कॉलनी कक्ष) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

जळगाव येथील ४६ वर्षीय तक्रारदारांच्या घराचे वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावावर होते. महावितरणकडून वीज मीटर बदलण्याचे काम सुरू असताना तीन दिवसांपूर्वी वायरमन भूषण चौधरी तक्रारदारांच्या घरी आले होते. त्यावेळी चौधरीने तक्रारदारांना सांगितले की, त्यांच्या वीज मीटरचे सील तुटले आहे. त्यांनी त्यात छेडछाड केल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक दंड होऊन वीज चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वीज मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी भूषण चौधरीने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती.

एसीबीने रचला सापळा

यासंदर्भात १० जून २०२५ रोजी एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी केल्यावर आरोपीने पंचासमक्ष ५ हजारांची लाच मागितली आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, एसीबीने सापळा रचला होता. मंगळवारी, १० जून रोजी भूषण चौधरी याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी एसीबीने त्याला रंगेहात पकडले. अशा कारवाईमुळे महावितरणमधील भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, तपास अधिकारी निरीक्षक स्मिता नवघरे, पथक स.फौ. सुरेश पाटील (चालक), पो.हे.कॉ.सुनील वानखेडे, पो.कॉ. अमोल सूर्यवंशी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here