जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पथकाला मिळाले यश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील एका तरुणाला राहत्या घरी रात्री झोपलेला असतांना ‘विषारी’ सापाने जीवघेणा दंश केला. गंभीर झालेल्या तरुणावर योग्य ते औषधोपचार करून वैद्यकीय पथकाने ‘मृत्यूच्या दाढेतून’ परत आणले आहे. ही कौतुकास्पद यशस्वी कामगिरी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पथकाने केली आहे. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील शिवनी येथील २५ वर्षीय तरुण कर्णसिंग धैर्यसिंग पवारला गेल्या १४ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजता घरात झोपलेला असताना उजव्या कानाला ‘मण्यार’ अशा अतिविषारी सापाने दंश केला. त्याला तात्काळ भडगावातील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी औषधवैद्यक शास्त्र विभागात अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी तातडीने दाखल करून घेत त्याच्यावर उपचार सुरू केले. विविध तपासणीअंती त्याच्यावर व्हेंटिलेटर लावून उपचार करण्यात आले. नागापेक्षा ‘मण्यार’ हा साप अधिक विषारी आहे. त्याचे विष मेंदू आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करते. त्यामुळे रुग्ण बेशुद्ध होऊन त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, असे डॉक्टरांनी सांगितले.
औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या पथकाने केले शर्थीचे प्रयत्न
औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून कर्णसिंगचे प्राण वाचवले. त्यात औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पाराजी बाचेवार, श्वसन विकार विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ पुजारी, डॉ. सायली पाटील, डॉ. ऋचा चौधरी, डॉ. गोपाल घोलप, डॉ. पराग चोले, डॉ. प्रणव पाठक, कक्ष क्र. १४ येथील इन्चार्ज परिचारिका रूपाली पाटील यांनी रुग्णावर उपचार करून देखरेख ठेवली. रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला यशस्वीरित्या २० ऑगस्ट रोजी रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी कान, नाक, घसा, शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. अक्षय सरोदे उपस्थित होते.