चाळीसगाव नगरपरिषदेचा स्वच्छता प्रीमिअर लीगचा अनोखा उपक्रम

0
43

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील नगरपरिषदेच्यावतीने नागरिकांमध्ये शहर स्वच्छतेची भावना रूजावी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती बांधीलकी निर्माण व्हावी. यासाठी स्वच्छता प्रीमिअर लीग २०२३-२४ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३-२४, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३, नमो ११ कलमी कार्यक्रम अंतर्गत शहर स्वच्छता अभियानातील प्रीमिअर लीगला नागरिकांसह कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता प्रीमिअर लीग २०२३-२४चे शनिवारी, ९ डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजन केले आहे. शहरात नगरपरिषदेतर्फे आरोग्य स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्यात नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया, समस्या समजून घेत नगरपरिषदेकडून विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याची अंमलबजावणी नगरपालिकामार्फत करण्यात येत आहे. शासनाच्या स्वच्छता विषयक सूचना एकत्रित करून स्वच्छतेचे १४ निकष ठरविण्यात आले आहे.त्याआधारे प्रभागातील स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. ९ डिसेंबर रोजी लोकसहभागातून स्वच्छता करून अभियानाची सांगता करण्यात येणार आहे.

लीगमध्ये पर्यावरणपूरक नावे देऊन प्रभागानुसार टीम तयार केल्या आहे. त्या टीमचे मुकादम कर्णधार असतील. त्यांच्या अखत्यारीत कर्मचारी सदस्य असतील. अश्‍या १८ टीम असून त्याची स्पर्धा समतुल्य प्रभागाशी होईल. प्रत्येक टीमला ॲक्टिव्ह मोडवर स्वच्छता करण्याकरीता १ मार्गदर्शक नेमले आहेत. तसेच स्वच्छतेच्या १४ निकषानुसार प्रभागातील कामाचे मूल्यमापन करण्यासाठी चाळीसगाव नगरपालिका शाळांच्या शिक्षकांची परीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here