मालेगाव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू
साईमत /चाळीसगाव/प्रतिनिधी :
रस्त्याच्या बाजुला नादुरुस्त उभी असलेल्या पिकअप व्हॅनला मागून येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दि.९ जानेवारी रोजी रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची चाळीसगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
तौकीर अली पिरजादे (रा.मालेगाव) असे मयताचे नाव आहे. दि.९ जानेवारी रोजी रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास धुळे कडून चाळीसगाव मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे एक पिकअप वाहन भोरस फाट्याजवळ रस्त्यात नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका दुचाकीने उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने ॲम्बुलन्स बोलावून जखमीला चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव तौकीर अली पिरजादे असून ते मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
