महावितरणच्या विद्युत तारा, सीसीटीव्ही कॅमेरासह पोलचे नुकसान
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
शहरातील बांधकाम विभाग आणि रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाकी रस्त्यावर २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान अचानक एक झाड पडले. सुदैवाने, झाडाखाली कोणीही सापडले नसल्याने जीवितहानी टळली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याठिकाणी काही मोटार सायकली उभ्या होत्या. त्यांचे किरकोळ नुकसान झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात महावितरणच्या विद्युत तार तुटल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.नगर परिषदेने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा व पोल जमीनदोस्त झाल्याने अधिकचे नुकसान झाले आहे.
सविस्तर असे की, शहरातील ‘वाकी रोड’ चा भाग नेहमीच गर्दी असलेला आणि वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ असलेला म्हणून ओळखला जातो. त्याच रोडाच्या बाजूला रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला उभे असलेले मोठे झाड अचानक दुपारच्या सुमारास रोडावर कोसळले. दुर्घटनेत विजेचे तार तुटून विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून झाडाजवळ उभी असलेली एक महिला थोडक्यात बचावली आहे.
धोकादायक झाडांची छाटणी करण्याची मागणी
या घटनेमुळे काही वेळ रस्ता रहदारीसाठी बंद केला होता. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेने आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडाची छाटणी करून रस्ता तात्काळ सुरू केला. यावेळी वाकी रोड भागात मोठ्या प्रमाणात धोकादायक झाडे उभे आहेत. त्याच झाडांजवळून विद्युत वाहिनींचे तार जात असल्याने एखादा मोठा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? असेल. त्यासाठी संबंधित विभागाने या भागातील धोकादायक झाडांची छाटणी करून परिसरातील नागरिकांसह वाहतूक करणाऱ्या लोकांना सहकार्य करावे, अशी मागणी शहरातून होत आहे.