साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
मंदिरांचे गाव म्हणून ओळख होवू पाहणाऱ्या पहूर गावात लोकसहभागातून भगवान नागेश्वर महादेवाचे मंदिर उभारले जात आहे. श्रीक्षेत्र हनुमान मंदिरातर्फे आगामी वर्षात रौप्य महोत्सवी किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. नागेश्वर महादेव मंदिराच्या उभारणीत अधिकाधिक भाविकांनी आपले योगदान देण्याचे आवाहन श्री क्षेत्र हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय बनकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौथे, सचिव विशाल चव्हाण, विश्वस्त दीपक जाधव यांच्यासह विश्वस्त मंडळाने केले आहे. यासाठी लेलेनगर येथील तरूण मित्रमंडळ व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत.
लेलेनगरात १९८५ मध्ये दादासाहेब कॅप्टन डॉ. एम. आर. लेले यांच्या सहकार्याने शिवभक्त रंगनाथ महाराज, स्व.नामदेव घोंगडे, स्व.नामदेव उबाळे, स्व.अनंत सोनार गुरुजी, स्व.सखाराम घोंगडे, स्व.अर्जुन उखा घोंगडे, सुधाकर चौधरी, ह.भ.प. गजानन महाराज, सरुबाई फुलपगारे, मथुराबाई सोनवणे, वत्सलाबाई चिमकर, कस्तुराबाई देशमुख आदी भाविकांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या दातृत्वातून श्री क्षेत्र हनुमान मंदिराची उभारणी केली. याच श्री क्षेत्र हनुमान मंदिराच्या माध्यमातून मंदिराशेजारीच नागेश्वर महादेवाचे टुमदार मंदिर उभारले जात आहे. यासाठी भाविकांचे मोठे सहकार्य लाभत आहे. पश्चिम मुखी असलेले हे नागेश्वर महादेवाचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ येथील नागेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती असल्याचे ज्ञानेश्वर चौथे यांनी सांगितले.