फेसबुकवरील मैत्री महागात जळगावच्या तरुणावर ब्लॅकमेलिंगचा फटका
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावध न राहिल्याने जळगावचा १९ वर्षीय विद्यार्थी आर्थिक फसवणुकीचा बळी ठरला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये फेसबुकवर एका अनोळखी तरुणीशी ओळख झाल्यानंतर त्याला तब्बल ५ लाख ९५ हजार ४५० रुपये ब्लॅकमेलिंगद्वारे उकळण्यात आले, अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पीडित तरुण सध्या नाशिक येथे बीएससीचे शिक्षण घेत आहे. त्याची फेसबुकवरून ओळख झालेल्या तरुणीने त्याला Tango नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अॅपवर ‘नेहा शर्मा’ नावाच्या महिलेबरोबर त्याची ओळख झाली. काही दिवसांतच तिने त्याला अश्लील व्हिडिओ कॉल करण्यास प्रवृत्त केले.
या कॉलचे रेकॉर्डिंग गुप्तपणे करण्यात आले आणि त्यानंतर आरोपींनी स्वतःला दिल्ली सायबर पोलिस असल्याचे सांगून तरुणाला धमकावणे सुरू केले. रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होईल, अशी भीती दाखवत आरोपींनी वेळोवेळी पैसे मागितले.
भिडल्याने, पीडित तरुणाने वडिलांच्या बँक खात्यातून ६४ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे पैसे पाठवले. प्रत्येक व्यवहारात ३०० ते २५ हजार रुपये इतके रकमेचे पैसे पाठवण्यात आले आणि एकूण ५ लाख ९५ हजार ४५० रुपये उकळण्यात आले.
हा प्रकार लक्षात आल्यावर पीडिताने जळगाव सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून नागरिकांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
सायबर पोलिसांनी सांगितले की, “अनोळखी व्यक्तीकडून लिंक क्लिक करणे, अॅप डाउनलोड करणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे धोकादायक ठरू शकते. सावधगिरी बाळगणे आणि त्वरित पोलिसांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.”
या घटनेने एकदा पुन्हा अधोरेखित केले की, फेसबुकवरील मैत्री ही काही वेळा महागात पडू शकते आणि डिजिटल सुरक्षिततेसाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.
