दुकाने बंद ठेवून व्यावसायिकांनी बंदला दिले समर्थन, शेतकऱ्यांसह सर्वांचे व्यवहार ठप्प
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर या देशात सामुदायिक हिंसाचार मोठ्या प्रमाणावर झाला. अशा सत्तांतर घडामोडीत बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू लोकांना अराजकता माजविणाऱ्या विविध संघटनांनी नियोजपूर्वक लक्ष करून हिंदूंची पवित्र मंदिरे, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि घरांना आगी लावून प्रचंड प्रमाणात हिंदू समाजाचे नुकसान केले. बांगलादेशातील सत्तांतर ही त्या देशाची अंतर्गत आणि सत्तेची लढाई असतांना त्यात हिंदू समाजाला वेठीस धरून त्यांना देशातून जाण्यास भाग पाडले जात आहे. अनेक हिंदू कुटुंब आणि त्या परिवारातील महिला, पुरुष, लहान मुले तरुणींचा अमानुष छळ आणि अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे हिंदू लोकांना जगणे कठीण झाल्याची विदारक परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते.
जामनेरला सकल हिंदूत्ववादी संघटनेतर्फे तहसिलदारांना निवेदन
जामनेर : बांगलादेशात अल्पसंख्यांक समाज बांधवांवर खास करून हिंदू बांधवांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ १६ रोजी जामनेर तालुक्यासह शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये शहरासह तालुक्यातील व्यापारी वर्ग, सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून बंद शांततेत आणि कडकडीत पाळण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाजाच्यावतीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सकल हिंदू समाज संघटनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर झालेल्या अत्याचाराचा संपूर्ण हिंदू समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. बांगलादेशातील सकल हिंदू समाज व अल्पसंख्यांकांना भारत सरकारने सुरक्षा पुरवावी, अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण देशातील हिंदू समाजाकडून केली जात आहे. यामुळे देशातील सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी ‘भारत बंद’चा मार्ग अवलंबला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण देशात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याच विषयाला अनुसरून सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी जामनेर शहरासह तालुका बंदचे आवाहन केले होते. बंदला व्यापारी वर्गासह, सर्वसामान्य जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांनी घटनेच्या निषेधार्थ शांततेत कडकडीत बंद पाळला.
चोपड्यात नागरिकांचा निघाला विशाल मोर्चा
चोपडा : बांगलादेशातील अन्याय, अत्याचाराविरुध्द आवाज उठविण्यासाठी शहरात सकल हिंदू समाजाच्यावतीने निषेध मोर्चा तसेच अन्यायग्रस्तांना भावनिक बळ देण्यासाठी हिंदू समाजाचा जळगाव जिल्हा बंद आवाहनाला चोपड्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली तर कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचे व्यवहार ठप्प झाले होते. तसेच सकाळी १० वाजता विश्रामगृहापासून निघालेल्या विशाल मोर्चात हजारो नागरिक, व्यापारी, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. मेनरोड, गोलमंदिर, गुजराथी गल्ली, राणी लक्ष्मीबाई चौक मोर्चा जावून गांधी चौकात जाहीर सभेने मोर्चाची सांगता झाली. मोर्चात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मागण्यांचे फलकही धरण्यात आले होते. याप्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना मोर्चाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी धर्मजागरण मंचचे दत्तनाथ महाराज यांनी बांगलादेशात हिंदूंचे होत असलेल्या अत्याचाराचा तीव्र शब्दात निषेध केला. हिंदूवरील अन्याय अत्त्याचार मोडून काढण्यासाठी जात पात, पंथ यांना सोडून देव, धर्म व देशासाठी एक होण्याचे आवाहन केले. सनातन संस्थेचे प्रशांत जुवेकर यांनी गोरक्षकांना विनाकारण गुन्ह्यात गोवून त्रास दिला जात असल्याचे सांगून वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी प्रकर्षाने केली. वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्यासाठी लढा उभारण्यास मदत करण्याचे आवाहन केले. मोर्चात सर्व हिंदुत्ववादी संघटना, गणेश मंडळाचे सुमारे सात हजार नागरिक सहभागी झाले होते.
पाचोऱ्यात स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये घेतला सहभाग
पाचोरा : बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेले हिंदूवर होत असलेले अन्याय, अत्याचार आणि दडपशाही त्वरित थांबवावी, यासाठी जगभरात आणि भारत देशात आंदोलने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात पुकारलेल्या बंदच्या आवाहनात पाचोरा शहरात आणि ग्रामीण भागातही उत्स्फूर्त बंद यशस्वी झाला. पाचोरा येथे सर्वधर्मीय बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदवून आपआपले दैनंदिन कामकाज, व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवून सहकार्य केले. पाचोरा बंदमध्ये अत्यावश्यक सेवेतील सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद होते. कोणतीही अनुचित घटना न घडता बंद १०० टक्के पाळण्यात आला. विविध हिंदू सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदमध्ये सहभाग होता. पोलीस यंत्रणेच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पाळधीत दुकाने बंद, मुख्य रस्त्यावर शुकशुकाट
पाळधी, ता.धरणगाव : जळगाव जिल्हा बंदनिमित्त येथेही शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. बांगलादेश येथे हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार प्रकरणी जिल्ह्यातील सकल हिंदू संघटनांनी बंद पुकारला होता. शुक्रवारी येथे साप्ताहिक बाजाराचा दिवस होता. येथील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला समर्थन दिले. दुकाने बंद असल्याने मुख्य रस्त्यावर शुकशुकाट होता. व्यावसायिक आणि नागरिक चौकात उभे राहून चर्चा करीत होते. बंदनिमित्त पाळधी पोलीस चौकीचे स. पो. नि.प्रशांत कंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.