जामनेरात पथनाट्य कलावंताला वाहनाची धडक

0
47

गंभीर अवस्थेत जळगावला हलविले, प्रकृती स्थिर

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

शहरातील गजबजलेल्या वाकी रस्त्यावरील ‘माऊली किराणा’जवळ भीषण अपघात घडला. अपघातात वाकी बु. येथील सोनेश्वर मंदिराजवळील दर्शन पार्कमधील रहिवाशी तथा महाराष्ट्रभर स्वच्छ, सुंदर, आरोग्य मिशनबाबत जनजागृती करणारे पथनाट्याचे कलावंत संतोष सराफ हे सिमेंट मिक्सर वाहनाच्या चाकाखाली आल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यांना लागलीच रुग्णवाहिकेने जळगाव येथे खासगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही.

सविस्तर असे की, पथनाट्याचे कलावंत संतोष सराफ हे दर्शन पार्क येथील घराकडून वाकी रोडमार्गे जामनेर शहरात काही खासगी कामानिमित्त जात होते. माऊली प्रोव्हिजनजवळ रस्त्याचे काम सुरु असल्याने याच भागात जवळच पोस्ट ऑफिस व सेंट्रल बँक असल्याने अपघात झालेल्या ठिकाणी नेहमीच गर्दी होत असते. त्यातच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु झाल्याने याभागात बऱ्याचवेळी ट्रॅफिक जाम होत असते. अशातच गर्दी असल्यामुळे येथून वाहन चालकाला आपले वाहन बाहेर काढतांना कसरत करावी लागत होती. त्याच दरम्यान काम सुरु असलेल्या रस्त्याकडून वाकी गावाकडे जाणारे सिमेंट मिक्सरचे वाहन ( क्र. एम.एच.२० जी.सी. ४५८८) हे शहराकडे जाणाऱ्या संतोष सराफ यांच्या मोटर सायकलला धडकले. त्यात संतोष सराफ हे मिक्सर वाहनाच्या पुढील चाकाखाली आपल्या मोटर सायकलसह आल्याने ते गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here