साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर
येथील ओम कॉलनी परिसरातील दोन वर्षीय बालिका अंगणात खेळत असताना मोकाट असणाऱ्या कुत्र्यांनी तिला चावा घेतला. त्यामुळे तिला जळगाव येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अशा घटना शहरात जवळजवळ सहा महिन्यात सहा ते सात वेळा घडल्या आहेत. पालिकेला वेळोवेळी सूचना देऊनही मोकाट कुत्र्यांसह डुकरांना पकडण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना वेळीच आवर न घातल्यास पालिकेवर सावदा परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
सावदा शहरात मोकाट डुकरांसह कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. संपूर्ण गावात डुकरे फिरून जनतेचे आर्थिक नुकसान करीत आहे. तसेच मोकाट कुत्रेही बालकांना व नागरिकांना चावा घेत आहे. सावदा शहरात ओम कॉलनी परिसरातील दोन वर्षीय बालिकेला कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यावेळी नागरिक संतप्त झाले होते. प्रशासनाला कळविण्यात आल्यावरही त्यांनी काहीही उपाययोजना केली नाही.दुसऱ्या दिवशीही त्या कुत्र्याने एका वृद्ध नागरिकाला चावा घेतला. प्रशासनाला पत्रकारांनी फोन करूनही कारवाई न झाल्याने प्रशासनावर नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे. त्याचे आंदोलनात रूपांतर होऊन प्रशासनावर मोर्चा काढण्याची तयारी शहरातील नागरिकांनी केली आहे. त्यापूर्वीच प्रशासनाने डुकरांसह कुत्र्यांचा होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे.