ऑईलभरलेला ट्रक पलटला, दुचाकी बचावाने अपघात टळला
साईमत /पाचोरा/ प्रतिनिधी
पाचोरा शहरातील बायपास रोडवर आज दुपारी एका भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. भडगावकडून पहूरकडे जात असलेला ट्रक (MH 19 CX 4699) समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना पलटी झाली, मात्र मोठी जीवितहानी टळली.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक भरधाव वेगाने बायपासवरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक दुभाजकावरील इलेक्ट्रिक पोलला धडकला आणि विरुद्ध दिशेला पलटी झाली. ट्रकमध्ये ऑईल भरलेले असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती होती.घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परतेने हस्तक्षेप करून चालकाला सुरक्षित बाहेर काढले. त्याला किरकोळ दुखापत झाली असून सध्या त्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पाचोरा बायपास हा रस्त्यावर जडवाहनांची सतत वर्दळ असूनही अनेक वाहनचालक वेगमर्यादा पाळत नाहीत. या अपघातामुळे स्थानिकांकडून वाहतूक नियंत्रण अधिक कडक करण्याची मागणी पुन्हा एकदा उठली आहे.
