मनोरुग्णाला केले उपजिल्हा रुग्णालयात दाखल
साईमत/नवापूर/प्रतिनिधी :
शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा १०८ रुग्णवाहिकेचे पायलट लाजरस गावित यांनी पोलिसांसह मित्राच्या मदतीने एका मनोरुग्णाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन त्याचे प्राण वाचविले आहेत. मनोरुग्ण व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. त्यांना सहानुभूती आणि मदतीची गरज असते. या घटनेमुळे शहरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
नवापूर शहरातील गुजरातीसमोर एक अनोळखी मनोरुग्ण आपले जीवन कसे तरी जगत होता. अशातच सायंकाळच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते लाजरस गावित यांना फोन आला. एक अनोळखी व्यक्ती आहे, त्याला रुग्णवाहिका पाहिजे आहे. त्यानंतर ते त्याठिकाणी पोहचले. त्याठिकाणी मनोरुग्णाला त्यांनी बघितले. परंतु त्याची अवस्था खुपच दयनीय होती. त्याला चालताही येत नव्हते. त्यानंतर ११२ ला फोन करुन नवापूर पोलिसांची मदत मागितली. नवापूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे ट्राफिक पोलीस जे. पी.कोकणी, रवींद्र भोये हे त्याठिकाणी दाखल झाले. त्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु अनेक दिवसांपासून आंघोळ न केल्याने त्याची खुपच बिकट अवस्था होती.
‘त्या’ समाजसेवी व्यक्तींचे सर्वत्र कौतुक
नगरपालिकेत काम करणारे कर्मचारी अंकीत मावची मदतीला धावून आले. तेथे लाजरस गावित व अंकित मावची यांनी त्या व्यक्तीच्या पायातील प्लास्टिक पिशवी काढताना बघितले. तेव्हा जखम झालेल्या पायात किडे पडलेले होते. ते स्वच्छ करून त्याची आंघोळ केली. ट्राफिक पोलीस रवींद्र भोये यानी ५०० रुपयांची मदत करत नवीन ड्रेस घालून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचार डॉ.रेचल वळवी करत आहे. अशा घटनेमुळे त्या समाजसेवी व्यक्तींचे सर्वत्र कौतुक होत आहे.