चोपड्यात संतप्त आदिवासींचा मूक मोर्चा शहर पोलीस स्टेशनवर धडकला

0
49

विरवाडा शेत शिवारात घडली अमानुष घटना, पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर

साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

तालुक्यातील विरवाडा येथील एका शेतमजुराच्या चार अल्पवयीन मुली स्वतः च्या शेतातून काम करून घराकडे परतत होत्या. तेव्हा १३ वर्षीय मुलीला एका २० वर्षीय नराधमाने शेतात ओढून नेत तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून मुलीच्या डोक्यात दगड टाकून तिचा खून केल्याची हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे मानव समाजात प्रचंड आकोश, पूर्ण चीड निर्माण झालीआहे. त्यामुळे नराधमास कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. आदिवासी कार्यकर्ते डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या निदर्शनात सुमारे ४०० ते ५०० आदिवासींचा अमानुष पाशवी कृत्याचा, सैतानी मनोवृत्तीचा जाहीर निषेध, नराधमाला फाशी द्या फाशी द्या, अशा आशयाचा फलक घेऊन चोपडा शहर पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. आरोपिताला आमच्या ताब्यात द्या, असा आग्रह मोर्चेकरी करीत होते. यावेळी चोपडा शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना निवेदन देण्यात आले.

सविस्तर असे की, शनिवारी, ७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास अल्पवयीन आठ, दहा व १३ वर्षीय आणि एक वय माहीत नाही अशा चार बहिणी स्वतः च्या शेतातून काम करून घराकडे परतत होत्या. त्यातील १३ वर्षीयअल्पवयीन मुलीस संशयित आरोपी मुकेश पुन्या बारेला याने पकडून वाघ्या नाल्याकडे ओढून नेले. अन्य तिन्ही बहिणींनी घाबरून गावाकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर गावातील ४० ते ५० लोक जमून शेत परिसरात त्या मुलीचा शोध घेत असतांना विरवाडे शेत शिवारातील भगवान गोटू पाटील यांच्या कपाशीचे पीकात मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत व चेहरा दगडाने ठेचलेल्या छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात येऊन धडकताच घडलेल्या घटनेने गावावर एकच शोककळा पसरली. गाव हादरून सुन्न झाले होते.

याबाबत पोलीस सुत्रांना माहिती मिळताच फौज फाट्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही तासातच संशयितास पोलिसांनी बऱ्याच अंतरापर्यंत पायी जात ताब्यात घेतले. संशयित आरोपी मुकेश पुन्या बारेला (मुळचा रा.बलवाडी, ता.वरला, जि.बडवानी, सध्या रा.पाटचारीजवळ, चोपडा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळी भेट

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर चाळीसगाव परिमंडळ पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांनी भेट दिली. याप्रकरणी हामा सुमला बारेला याच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात आरोपी मुकेश पुन्या बारेला याच्याविरुद्ध भाग – ५ सीसीएनटीएस ४५४/ २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ६५, ६६ ,१०३(१) ,पोक्सो ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.कावेरी कमलाकर करीत आहेत.

संशयित आरोपीला तात्काळ घेतले ताब्यात

आदिवासी महिला, पुरुष घडलेल्या घटनेमुळे अतिशय उग्र झाल्याचे पाहून डॉ. चंद्रकांत बारेला यांनी घटनेनंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असल्याने त्यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत आभार मानून उपस्थितीतांची समजूत काढून सर्वांना पुन्हा शासकीय विश्रामगृहाकडे घेऊन गेले. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व त्यांचे सहकारी फौजदार, पोलीस कॉनस्टेबल स्टाफने चोख बंदोबस्त ठेवला होता.

पोलिसांनी तपासचक्रे फिरविली

रात्री उशिरापर्यंत एलसीबी पथक, डॉग स्कॉड पथक, फॉरेन्सिक पथक, चाळीसगाव विभागाचे ॲडीशनल एस.पी.चोपडा विभागाचे पोलीस अधिकारी, घटनास्थळी दाखल होऊन तपासचक्रे फिरविली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयाकडे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला होता. त्यानंतर रविवारी, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here