चालकाने बस थेट पोलिस ठाण्यात आणून चार संशयितांना ताब्यात घेतले
साईमत/ यावल /प्रतिनिधी
जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ काही कमी होत नाही; गर्दीच्या फायद्याचा चोरट्यांचा प्रयत्न आता बस प्रवाशांवरही स्पष्ट दिसून येतोय. भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेत भुसावळहून यावलला जात असलेल्या एसटी बसमध्ये चिखली बुद्रुक येथील २८ वर्षीय शुभांगी लोमेश सावळे यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याची पोत चोरी झाली.
हा प्रकार अंजाळे जवळ उघडकीस आला. शुभांगी सावळे अंजाळे बस स्थानकावर उतरली तेव्हा पोत चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस चालक आणि वाहकाला माहिती दिली. चालकाने तत्काळ शहाणपणाचे प्रदर्शन करत बस थेट यावल पोलिस ठाण्यात आणली.
बसमध्ये तब्बल ५० हून अधिक प्रवासी होते. पोलिसांनी चौकशी करत दोन महिला व दोन पुरुष अशा चार संशयितांना ताब्यात घेतले. प्रवाशांची सविस्तर झडती घेऊन पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेत बस चालकाच्या तत्परतेमुळे चोरीचा उघडा प्रकार लवकर समोर आला आणि संशयितांना ताब्यात घेता आले.
यावल पोलिसांनी प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी बसमध्ये प्रवास करताना आपली वस्त्रे, दागिने आणि महत्त्वाची सामग्री सुरक्षित ठेवण्याचे सूचना दिल्या आहेत.
