साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथे उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी जळगाव, धुळे किंवा छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता. सद्यस्थितीत असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात येऊन तेथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र, याबाबत संयुक्तिक असा प्रस्तावच राज्य शासनाकडे दिला न गेल्याने गेली अनेक वर्षे या मागणीला मूर्त स्वरूप आले नाही. मात्र राज्यात महायुती सरकार आल्यानंतर ना.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आ.मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना गती दिली. विविध विकासकामे व प्रकल्प यांच्या प्रलंबित फाईली युद्धपातळीवर शासनाकडून मंजूर होऊ लागल्या. ७ मार्च रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन मंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते झाले होते. राज्यात तब्बल १३ वर्षांनंतर मंजूर झालेले हे पहिले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असल्याने त्याची राज्यात चर्चा झाली होती. उद्घाटन समारंभातच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालय मंजुरीचे संकेत दिले होते. त्यानंतर अवघ्या पाच दिवसातच १२ मार्च रोजी चाळीसगाव येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने चाळीसगाव वासीयांना महायुती सरकारकडून डबल भेट म्हणून मिळाली आहे.
केवळ मंजुरी मिळून थांबणार नसून उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन अत्याधुनिक इमारत बांधकामासाठी बिलाखेड शिवारात शासकीय जागेचीही मागणी केली आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त उपजिल्हा रुग्णालय चाळीसगाव वासीयांच्या सेवेत दाखल होईल. उपजिल्हा रुग्णालय मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, आरोग्य सेवा संचालनालय संचालक, सहसंचालक, उपसंचालक यांचे आ.मंगेश चव्हाण यांनी आभार मानले आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांचा स्टाफ आता चाळीसगावातच
चाळीसगाव येथे उपजिल्हा रुग्णालय नसल्याने तालुक्यातील रुग्णांना जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत होते. त्यामुळे रुग्णांच्या वेळेचा अपव्यय होत होता. आता लवकरच चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयामुळे अनेक उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा स्टाफ तसेच अत्याधुनिक सोयी सुविधा ह्या चाळीसगाव येथे शासनाकडून पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुकवासीयांची जळगाव, धुळे वारी आता टळणार आहे.