साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या प्रवाशी रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ धाव घेत आग विझविली. मात्र तोपर्यंत प्रवाशी रिक्षा जळून खाक झाली होती. ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती हाती आलेली नाही.
याबाबत माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाणपुला जवळून गेलेल्या रस्त्यावर गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगावातून पिंप्राळा परिसराकडे रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ३४८८) ही प्रवाशी घेवून चालक जात होता. त्यावेळी अचानक रिक्षाने पेट घेतला. ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रिक्षा रोडच्या बाजूला घेवून रिक्षा थांबविली. त्यानंतर क्षणातच रिक्षाने मोठा पेट घेतला. यात संपुर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली यांची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, घटनेची माहिती समजताच महापालिकेचे अग्निशमन दलाच्या पथकातील युसुफ पटेल, भारत बारी, रविंद्र बोरसे आणि तेजस जोशी यांनी बंबासह घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्यात आली. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.