साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील रिक्षा चालक अजितसिंग विठ्ठलसिंग राजपूत (रा. महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी, चाळीसगाव) यांना रिक्षात सापडलेली ६० हजाराची सोन्याची ११ ग्रॅम वजनाची पोत बॅगसह पोलिसांच्या कामगिरीमुळे प्रवाशाला सुपूर्द केली. त्यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाची बॅग परत करुन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक हेोत आहे. चाळीसगाव शहरातील रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षात प्रवाशांचे काहीएक सामान बॅग, मोबाईल फोन, तसेच मौल्यवान वस्तू मिळुन आल्यास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे पोलिसांतर्फे आवाहन केले आहे.
सविस्तर असे की, २५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास सुदाम सोपानराम माकोडे (रा. रांजणगाव, एमआयडीसी वाळुंज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हे त्यांच्या पत्नीसह मनमाड येथुन रेल्वेने चाळीसगाव येथे आले होते. त्यांना पुढील प्रवासाकरीता भडगाव तालुक्यातील कनाशी येथे जायचे होते. ते चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथुन रिक्षात बसुन बस स्टॅण्ड येथे उतरले. तेव्हा ते त्यांच्याकडील एक लाल रंगाची बॅग तिच्यात ६० हजार रुपये किंमतीची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत रिक्षात विसरुन गेले होते. त्यानंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रिक्षाचा शोध घेतला. मात्र, ती मिळुन न आल्याने ते चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले होते.
पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर सुदाम माकोडे यांना पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी विचारपूस करुन लागलीच बॅग व रिक्षा चालकाचा शोध घेण्याकामी पोलीस अंमलदार यांचे पथक रवाना केले. पथकाने चाळीसगाव रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड तसेच चाळीसगाव शहर परिसरात रिक्षा चालकाचा शोध घेतला. तेव्हा तो मिळुन आल्याने त्याच्याकडे विचारपुस करुन त्याची रिक्षा तपासली. तेव्हा त्याच्यात सुदाम सोपानराम माकोडे यांची लाल रंगाची बॅग मिळुन आली. तेव्हा बॅगची तपासणी केल्यावर बॅगेत त्यांची पत्नी अर्चना सुदाम माकोडे यांची ६० हजार रुपये किंमतीची ११ ग्रॅम सोन्याची मणी मंगळसुत्र असलेली पोत मिळुन आली. पथकाने १ तासाच्या आत हरविलेली बॅग आणि त्यातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची ११ ग्रॅम वजनाची पोत शोधून काढुन उल्लेखनीय कामगिरी केली. बॅग व सोन्याची पोत ही मूळ मालक सुदाम सोपानराम माकोडे यांच्या सुपूर्द केली. त्यांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पी.एस.आय. सुहास आव्हाड, पो.हे.कॉ. राहूल सोनवणे, योगेश बेलदार, पो.ना. महेंद्र पाटील, भूषण पाटील, पो.शि. रवींद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे, पो.कॉ. पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, ज्ञानेश्वर गिते यांनी केली आहे.