साईमत, जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि जैन स्पोर्टस् ॲकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर नुकत्याच घेण्यात आल्या. वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या बलाढ्य पश्चिम बंगाल संघाला नमवत ‘महाराष्ट्र’ संघाने दिमाखात विजय मिळविला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपूर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या स्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पूर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले गेले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतराज्य वरिष्ठ टी-२० क्रिकेट स्पर्धा-२०२३ स्पर्धेत शेवटच्या दिवशी गुणतालिकेत अव्वल व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘महाराष्ट्र’ संघात सामना रंगला. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. निर्धारित २० षटकात ९ विकेटच्या मोबदल्यात १०८ धावा महाराष्ट्र संघाने केल्या. त्यात तेजल हसबनीस २६, शिवाली शिंदे २४, मुक्ता मगरे १९ धावांचे योगदान दिले.
मुक्ता मगरे, ईशा पठारे ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित
बंगाल संघाकडून शलका ईसाब हिने ४ षटकात ४ विकेट घेतल्या. तिला मिता पाल व माली मंडळ यांनी प्रत्येकी दोन विकेट घेऊन साथ दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगाल संघ १८.१ षटकात फक्त ८३ धावांत गारद झाला. महाराष्ट्र संघ २५ धावांनी विजयी झाला. महाराष्ट्र संघाकडून मुक्ता मगरे हिने ३ विकेट घेतल्या. मुक्ता मगरे हिने उत्कृष्ट क्षेत्रररक्षण करत एक धावबाद व दोन झेल घेणाऱ्या ईशा पठारे यांना संयुक्तिक सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ॲपेक्स सदस्य अतुल जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रमेश जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, सदस्य युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, जैन फार्मफ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन, अभंग जैन, जैन इरिगेशनच्या एचआरडी विभागाच्या राजश्री पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष रेखा गोडबोले आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र संघाची मुक्ता मगरे ठरली ‘मालिकावीर’
अंतिम सामन्यात पंच म्हणून संदीप गांगुर्डे, वरूण देशपांडे यांनी तर गुणलेखक म्हणून मोहम्मद फजल यांनी काम पाहिले. संपूर्ण मालिकेत गोलंदाजी व फलंदाजीने प्रभावित करणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या मुक्ता मगरे हिला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेत तिने ७७ धावा व ९ विकेट घेतल्या. उत्कृष्ट फलंदाज तेजल हसबनिस १३६ धावा, उत्कृष्ट गोलंदाज बंगालची शायिका ईसाब ९ विकेट, यष्टीरक्षक त्रिपुरा मोतोची देबनाथ ह्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संपूर्ण स्पर्धेत चषक जैन इरिगेशनतर्फे प्रदान करण्यात आले. यशस्वीतेसाठी जैन इरिगेशन व जैन स्पोर्टस ॲकडमीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.