आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवडीचा संकल्प
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकळी बु.येथील तथा हल्ली मुक्काम छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी ॲड. भाऊलाल हिरामण गणबास, सुकलाल गणबास, ब्रिजलाल गणबास यांच्या मातोश्री यशोदाबाई हिरामण गणबास यांचे गेल्या १० ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या उत्तरकार्याचा कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते शिवदास महाजन यांच्या हस्ते कुलदैवताच्या पूजनासह महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून नुकताच पार पडला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमास टाकळी खुर्द येथील माजी सरपंच बाळू चवरे यांनी सार्वजनिक सत्यधर्म विस्तृत मांडून, महापुरुषाचे कार्य व समाजात त्यांचे योगदान विषयावर प्रेरणात्मक प्रबोधन केले. अंधभक्त न होता सत्यशोधक समाजाची कास धरा, असा संदेश दिला. कार्यक्रमाला सत्यशोधक समाजाचे प्रचारक तथा जिल्हा सचिव रमेश वराडे, टाकळी खुर्द येथील माजी सरपंच सारंगधर अहिरे, सामाजिक कार्यकर्ते श्री.खनसरे, रामसिंग काठोटे, भगवान गणबास, हरचंद मगरे, दीपक गणबास, राजेश गणबास यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
यांच्याकडून मिळाली प्रेरणा
कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, संघटक कैलास महाजन, सहसचिव पवन माळी यांच्याकडून मिळाली. भविष्यातील सर्व कार्यक्रम मनुवादी व ब्राह्मणवादी भट यांच्याकडून न करता केवळ सत्यशोधक समाज पद्धतीनेच करण्याचा संकल्प करण्यात आला.