चाळीसगावला चोरीच्या गुन्ह्यातील पिकअप वाहन पकडले

0
12

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरात पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन रात्रगस्त पेट्रोलिंगची मोहीम राबविण्यात आली होती. पेट्रोलिंग करीत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास मालेगाव रस्त्यालगतच्या एल.पी.जी. पंपासमोर मालेगावकडून चाळीसगाव शहराकडे एक बोलेरो पिकअप वाहन भरधाव वेगाने येतांना दिसली. वाहन चालकास त्याचा जाब विचारल्यावर त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यावरुन पोलिसांचा संशय बळावल्याने पिकअप वाहन नाशिक जिल्ह्यातील मालेगावला दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन गुन्हा दाखल करुन पाच लाखाच्या पिकअप वाहनासह संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर असे की, मालेगाव रस्त्यालगतच्या एल.पी.जी. पंपासमोर रात्री गस्तीवर असलेले पो.ना. अमृत पाटील, पो.कॉ. विजय पाटील यांनी पिकअपच्या वाहन चालकास थांबविण्याचा इशारा केला होता. तेव्हा त्याने वाहन न थांबविता भरधाव वेगाने मालेगावकडून चाळीसगाव शहराकडे चालवित नेले. तेव्हा पोलीस अंमलदार यांना वाहनावर संशय बळावल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग करून वाहनास हॉटेल आशिष गार्डन समोर थांबविले. तेव्हा वाहन चालकास ‘तु वाहन एवढ्या भरधाव वेगाने का चालवित आहात’, अशी विचारपूस केली. तेव्हा त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यास त्याचे नाव, गाव विचारल्यावर त्याने त्याचे नाव शेख फरान शेख आरीफ (वय २२, रा. अक्सा कॉलनी, हाजरा मस्जिदजवळ, मालेगाव, जि. नाशिक) असे सांगितले. त्यास त्याच्या ताब्यातील पिकअप वाहनाच्या मालकी हक्क आणि कागदपत्रांबाबत विचारपूस केली. तेव्हा त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तरे दिली. तो पिकअप वाहनाच्या मालकी हक्काबाबत कोणताही दस्तऐवज अगर पुरावा सादर करु शकला नाही. त्यामुळे पोलीस पथकाचा अधिक संशय बळावल्याने पिकअप वाहन हे चोरीचे असल्याबाबत खात्री झाली. त्यावरुन त्याच्याविरुध्द पो.कॉ.विजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले आहे.

तपासात चोरीचे वाहन असल्याचे निष्पन्न

गुन्ह्याचा सखोल तपास पो.हे.कॉ. राहुल सोनवणे आणि पो.कॉ. ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केला. तपासात मिळून आलेले पाच लाखाच्या किंमतीची महिन्द्रा कंपनीची बोलेरो पिकअप वाहन हे छावणी पो.स्टे. मालेगाव, जि. नाशिक ग्रामीणकडील गुरनं. २८२ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशावरुन अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राहुल सोनवणे, पो.ना.अमृत पाटील, महेंद्र पाटील, भूषण पाटील, पो.कॉ. विजय पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, समाधान पाटील, राकेश महाजन, मो.कॉ. ज्ञानेश्वर गिते यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here