जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई, भुसावळात अटक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क कारवाईत गुजरात राज्यातील अट्टल गुन्हेगार साहील उर्फ सलीम पठाण (वय २१, रा. भाटिया गाव, हाजीपुरा, सचिन, जि. सुरत) याला भुसावळ शहरात सापळा रचून अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी तापी व्यारा (सेशन कोर्ट, गुजरात) येथील गंभीर गुन्ह्यात फरार होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या अटकेसाठी गुजरात पोलिसांना शोध सुरू होता.
गुजरातमधील निझर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीवर तापी व्यारा कोर्टातील केसनुसार जबरी चोरी, शारीरिक मारहाण तसेच कट रचण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. एलसीबीच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. तसेच गुजरात पोलिसांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. अटक केलेला आरोपी पुढील चौकशीसाठी गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पी.एस.आय.शरद बागल, रवि नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, पो.कॉ.प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे यांनी केली आहे.