साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १९ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असतांना अल्पवयीन मुलगी ही बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू, ती कुठेही मिळून आली नाही. दरम्यान, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी गावात राहणारा सावन शांताराम भील यानेच पळवून नेल्याची तक्रार पहूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सावन भील याच्या विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. भरत लिंगायत करीत आहे.