आरोपी पसार, परिसरात भीतीचे वातावरण
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात गुरुवारी (ता. २२) रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना जुना मारुती मंदिर परिसरात रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास घडली. सागर अरुण बिऱ्हाडे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे गावात भीती व हळहळीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सागर बिऱ्हाडे आणि एका संशयित तरुणामध्ये काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. पाहता पाहता या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. संतापाच्या भरात संशयित आरोपीने सागरला जोरात ढकलले. या झटापटीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत सागरला बेशुद्ध अवस्थेत गावातील डॉक्टरांकडे नेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच सागरची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सागर बिऱ्हाडे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार असून, या घटनेमुळे बिऱ्हाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, शांततेचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, फरार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेने पुन्हा एकदा समाजात वाढत चाललेल्या असहिष्णुतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
